बीड : धुळे आणि मालेगावमध्ये जमावाने वाटसरुंना बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही असाच प्रकार घडला. बीडपासून जवळ असलेल्या पेंडगाव परिसरात ट्रकला दबा देऊन बसलेल्या दोघांना जमावाने मारहाण केल्याची घटना घडली.

मारहाण केलेल्या व्यक्तींना लोकांनी लपत असताना पाहिलं. चौकशीत त्यांना स्वतःबद्दल माहिती देता आली नाही. त्यामुळे लोकांना त्यांना चोर समजून मारहाण केली. त्यांना ताब्यात ठेवूनच लोकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी या दोघांची सुटका केली.

यातील एक जण मुकुंद मुरलीधर दुषी (वय 45, रा. करीमपुरा, बीड) राहणारा  असून तो मनोरुग्ण आहे. तर दुसरा अशोक मोहन माथाडे (ता. जि. खंडवा, मध्यप्रदेश) राहणारा आहे.

अशोक दाभाडेला दारुचं व्यसन आहे. तो ट्रकवर क्लिनर आहे, त्याचा ट्रक चालकाशी वाद झाला म्हणून चालकाने त्याला पेंडगावजवळ सोडून दिलं होतं. दोघेही सोबत असल्याचा गैरसमज झाल्यानेच लोकांनी यांना मारहाण केली.

राज्यभरात मारहाणीच्या घटना

सर्वात अगोदर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चांदगाव भागात 8 जून रोजी चोर समजून सात जणांना बेद मारहाण करण्यात आली. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर औरंगाबादमध्येच 16 जून रोजी पडेगावमध्येही एकाचा अशाच प्रकारामध्ये मृत्यू झाला. ईद मागण्यासाठी आलेल्या दोन बहुरुप्यांना मारहाण करण्यात आली होती.

औरंगाबादमधील कमळापूरमध्ये महिला नव्या घराच्या शोधात असताना मुलं पळवण्याच्या शोधातून जमावाकडून मारहाण करण्यात आली.

लातूरमध्ये औसा तालुक्यातील बोरफळामध्ये 29 जून रोजी नवरा-बायकोच्या भांडणाला मुले पळवण्याचं स्वरुप देऊन मारहाण करण्यात आली.

लातूर जिल्ह्यातील निलंग्यातील हलगरामध्ये रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने रिक्षाही जाळली.

29 जून रोजी नंदुरबारमध्ये भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. मुलगी तिच्याच घरात सापडल्याने प्रकरणावर पडदा पडला.

परभणीत 20 जून रोजी मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन दोन जणांना मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांना पोलिसांना देण्यात आलं.

धुळ्यात पाच जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात राईनपाडा हे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गाव आहे. या गावाच्या आठवडे बाजारात काहीजण फिरत होते. हे फिरणारे लोक मुले पळवणारी टोळी आहे, असा संशय घेऊन 1 जुलैला दुपारी त्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली.

मुलं पळवण्याच्या संशयातून पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राईनपाडा गावात नागरिकांनी 5 जणांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना ग्रामपंचायतच्या खोलीत डांबण्यात आलं. तिथंही त्यांना बेदम मारहाण झाली. यावेळी संपूर्ण खोलीत रक्ताचा सडा पडलेला दिसला. मारहाण झालेले एका कोपऱ्यात विव्हळत असतानाही त्यांच्यावर उपचार करायचे सोडून, जमावाकडून त्यांना मारहाण सुरुच राहिली. आणि त्यातचं या पाचही जणांचा जीव गेला.

मृतांपैकी भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अगनू इंगोले हे चौघेजण सोलापुरातील मंगळवेढा येथील राहणारे होते, तर राजू भोसले कर्नाटकमधील राहणारे होते.

सोशल मीडियावरील अफवांमुळे गैरसमज

राज्यात आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी समजून अनेक मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळी आली असल्याचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. हे मेसेज वाचल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील सुशिक्षित मंडळींनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे.

पोलिसांच्या वतीने जाहीर आवाहन

वाढत्या घटना पाहता राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. बीड पोलिसांनी केलेलं आवाहन..

मागील काही दिवसांपासून मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे. परंतु अशी कुठलीही टोळी नसून या केवळ अफवा आहेत, हे वारंवार सांगितल्यानंतरही निष्पाप लोकांना मारहाण केली जात आहे. कसलीही खात्री न करता मारहाण केल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशीच घटना धुळे येथे घडली असून या अफवेवर विश्वास ठेवून नागरिकांनी मारहाण केल्याने पाच जणांचा जीव गेला आहे. तर असे करू नका. बीड जिल्ह्यातही अशा अफवांवर विश्वास ठेवून मारहाण झाल्याच्या घटना माजलगाव, गेवराई, परळी आणि बीडमध्ये घडल्या आहेत. खात्री केली असता हे सर्व लोक निष्पाप असून सामान्य कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मारहाण करणाऱ्यांविरोधात माजलगावमध्ये दोन वेळेस गुन्हेही दाखल झाले आहेत. तसेच पेठबीड पोलीस ठाणे हद्दीत मारहाण झाल्याचा खोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या एकाविरोधात पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.

त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते, की अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी संशयास्पद व्यक्ती दिसली तर तिच्याबद्दल जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क करा. निष्पाप लोकांना मारहाण करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन आम्ही करीत आहोत. आपल्याकडून आम्हाला आतापर्यंत चांगले सहकार्य मिळाले आहे आणि यापुढेही मिळेल, अशी अपेक्षा आम्ही करतो.

संपर्क - नियंत्रण कक्ष 02442-222333/222666

आपल्या सेवेत सदैव असणारे बीड जिल्हा पोलीस दल