सांगली : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अखेर अटक झाली आहे. विटा तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण प्रकरणी ही अटक झाली आहे. वाळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा यावरून तहसीलदारांना मारहाण केल्यानंतर चंद्रहार फरार होता. अखेर आटपाडी तालुक्यातील दिघंची परिसरातून चंद्रहारला आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे.


सांगलीच्या स्थानिक क्राईम ब्रान्च आणि विटा पोलिसांनी ही संयुक्तपणे अटकेची कारवाई केली. चंद्रहार आणि त्याच्या साथीदाराला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. 3 मे रोजी विटा तहसील कार्यालयात मारहाणीची घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून चंद्रहार फरार झाला होता. चंद्रहारला अटक करावी, यासाठी जिल्ह्यातील महसूलच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस कामबंद आंदोलन देखील केले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महसूल अधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका घेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या ठोस आश्वासनानंतर काम सुरू केले होते.


अखेर पंधरा दिवसांनी चंद्रहारला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आटपाडी तालुक्‍यातील दिघंची येथे चंद्रहार येणार असल्याची माहिती लोकल क्राईम ब्रांन्चच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार चंद्रहार आणि त्याचा साथीदार सागर श्रीमंत सुरवसे याला अटक केली गेली.


3 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास चंद्रहार पाटील आणि साथीदार सागर सुरवसे याने तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण केली होती. वाळूच्या वाहनांवर केलेल्या कारवाईचा रोष मनात ठेवून व वाहनांना केलेला दंड रद्द करून वाहने सोडावित अशी मागणी चंद्रहार पाटील करत होता. तहसील कार्यालयाच्या आवारात शेळके त्यांच्या शासकीय गाडीत बसत असताना या दोघांनी त्यांना अडवले. त्यांना गाडीच्या बाहेर ओढून मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर चंद्रहार पाटील व सागर पळून गेले. त्यांच्या शोधासाठी तीन पथके कार्यरत केली होती. ते दोघे पसार झाल्यापासून त्यांचा शोध सुरु होता.


जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी चंद्रहारच्या अटकेसाठी तीन पथके तयार करून त्याच्या अटकेच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या पथकांनी कराड, सुर्ली, आटके, तासगांव, कुंडल व भाळवणी व परिसरात त्यांचा शोध घेतला. परंतु ते सापडले नाही. अखेर आज या दोघांना अटक करण्यात आली आहे.