मुंबई: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याच्या आरोपावरुन दोन वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र या महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना एसीबीने दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.
त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी पीटीआयशी संवाद साधला.
“माझी मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही. मात्र मी भाजपही सोडणार नाही”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
पुढील वर्षी विधानसभा निवडणुका लागतील. त्यामुळे आता मंत्री होऊन करणार काय, असा सवालही खडसेंनी विचारला. वर्षभरात कुठे ना कुठे निवडणुका होत आहेतच. त्यामुळे आचारसंहिता लागणार.जरी मंत्री झालो तरी कामं करायलाच मिळणार नाही. त्यापेक्षा मंत्रिमंडळात न गेलेलंच बरं, असं खडसे म्हणाले.
भाजप माझी फॅमिली
भाजप मला माझ्या फॅमिलीसारखी आहे. भाजपमध्येच मी राजकीयदृष्ट्या लहानाचा मोठा झालो. त्यामुळे हा पक्ष माझं कुटुंब आहे. अडचणीच्या काळात भाजपनेच मला आधार दिला. त्यामुळे भाजप सोडण्याचा प्रश्नच नाही, असं खडसेंनी स्पष्ट केलं.
पालघरमध्ये गावितांना उमेदवारी का?
भाजप खासदार चिंतामन वनगा यांच्या मृत्यूमुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. मात्र या पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देणं चुकीचं आहे, असं खडसे म्हणाले.
शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन चूक केली म्हणता, मग तुम्ही राजेंद्र गावितांना उमेदवारी कशी दिली? असा सवाल खडसेंनी केला.
संबंधित बातम्या
कृतघ्न माणसं पाहिली, पण कृतज्ञ माणसांची संख्या जास्त : खडसे
भोसरी जमीन खरेदी प्रकरण : एकनाथ खडसेंना दिलासा