कोल्हापूर : रिक्त असलेल्या पदांवर गेली 12 ते 18 वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांच्या पदांना शिक्षण विभागाने रद्द केल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वेळप्रसंगी हमाली करा, पण शिक्षक होऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं. कोल्हापुरात आज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने बोलावलेल्या सभेत शिक्षक आमदारांपुढेच महिला शिक्षिकांनी रडत आपली गाऱ्हाणी मांडली, तर काही महिला शिक्षिका रडतच या सभेतून बाहेर पडल्या.
या सभेत जमलले बहुतांश शिक्षक हे गेली 12 ते 18 वर्षे महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहेत. मात्र शासनाने यांची पदे रद्द केल्याने त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचं हे शिक्षक सांगतात. तर काही शिक्षकांना रडूही आवरता येत नाही. मुलांनी हमाली करावी, पण शिक्षक होऊ नये असं मतही ते व्यक्त करतात.
2003 सालापासून कोल्हापूर विभागातील विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या 428 शिक्षकांची पदे शासन निर्णयाने व्यपगत अर्थात रद्द करण्यात आली आहेत. या संस्थांमध्ये त्या त्या वेळी पदे भरताना उमेदवार न मिळाल्याने संस्था चालकांनी शासानाची मान्यता घेऊन या शिक्षकांची नेमणूक केली होती. आता तब्बल 15 वर्षानी शिक्षण विभागाने या शिक्षकांची पदे रद्द केली आहेत.
आज कोल्हापुरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने बोलावलेल्या सभेत शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या समोर या शिक्षकांनी आपली गाऱ्हाणी मांडली. यावेळी एका शिक्षिकेचा रक्तदाब वाढला, तर काही शिक्षिकांना रडू कोसळलं. आता आम्ही काय करणार, आमचं घर कसं चालणार, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यामुळे काही काळ सभेत गंभीर वातावरण तयार झालं होतं.