मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाऊ नये, त्यामुळे लोकांना आश्वासनांची भूल पडू शकते, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना यासंदर्भात राष्ट्रपतींचीही भेट घेणार आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.


'राष्ट्रपतींनी अर्थसंकल्प फेब्रुवारीत मांडण्यापासून केंद्र सरकारला रोखावे. पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट फेब्रुवारीत मांडण्याचा डाव आहे. मात्र त्यामुळे जनतेला आश्वासनांची भूल पाडण्यात मोदी यशस्वी होतील. त्यामुळे शिवसेना खासदारांनी राष्ट्रपतींना अर्थसंकल्प निवडणुकांपूर्वी सादर होऊ न देण्याची मागणी करावी', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील इतर मुद्दे :

- नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मला जिवंत महाराष्ट्राचं दर्शन घडलेलं आहे.
- मला बोलू न देणारा अजून जन्माला यायचा आहे
- सुरुवातीला संघटनेचं काम सुरु केलं तेव्हा माझ्यावर घराणेशाहीचा आरोप झाले. घराण्याचे गुण किती आले माहित नाहीत, पण अवगुण आले. त्यामुळे जे पटत नाही त्याविरोधात बोलणारच
- लाल दिवा किती काळ टिकणार. जनतेशी नीट वागलात तर ते जे प्रेम देतील ते लाल दिव्यात मिळणार नाही
- नोटाबंदीला जनतेचा पाठिंबा असल्याचं भासवलं जात आहे, मात्र नागरिक मेटाकुटीला आले आहेत
- अच्छे दिनाची फक्त आशा उरली आहे. आजकाल जिवंत आहोत, हेच अच्छे दिन म्हणायचे
- निवडणुकांच्या जुमल्यावर यांनी यांचे इमले बांधले
- घोषणांची भूल लोकांना दिली जात आहे. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला.
- हिंदू धर्माच्या आधारावर आम्ही मतं मागितली नाहीत व हिंदुत्वाचं रक्षण आम्ही करणारच. मग तो गुन्हा असला तरी करणारच
- पंतप्रधान एका ठराविक पक्षाच्या किंवा एका उमेदवाराच्या प्रचाराला जाता कामा नयेत. पंतप्रधान हा सर्वांचा असतो, एका पक्षाचा नाही
- विजय मल्ल्या पळाला, मोदी पळाला, म्हणजे ललित मोदी... लाईनीत उभे कोण?
- जिल्हा बँकेवरची बंदी अजूनही उठवलेली नाही. मोठ्या बँकांनी पैसे बुडवले, शिक्षा मात्र जिल्हा बँकांना. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अडकले  नाबार्ड दरवर्षी जाहीर न करता 21 हजार कोटी देतं, यावर्षी जाहीर करण्यात आले, तेही अजून मिळालेले नाहीत.
- शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नसतो मग त्याचा पैसा तुम्ही का रोखता?
- जिल्हा बँकेत भ्रष्टाचार होईल म्हणून टाळं लावलं जातं, तरीही लाखो कोटींच्या नोटा बाहेर आल्या, त्या कुठून आल्या याची चौकशी कोण करणार?
- निती आयोगाचे पानडीया म्हणतात महिलांच्या बचतीवर लक्ष ठेवावे लागेल. म्हणजे आता आपले साखर, मीठ, पिठाचे डबे सरकार उघडून बघणार. जो येईल त्याला आधी मसाल्याचा डबा उघडून द्या आणि डोकं घालून बघ म्हणावं किती पैसे आहेत.
- पुणे मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं आणि हरित लवादाने स्थगिती दिली. सवंग लोकप्रियतेसाठी पंतप्रधानांचा अपमान कशाला?
- मी मतदारसंघात फिरणार पण माझ्या हातात काही नाही. दुसरीकडे नाताळबाबा (नाव न घेता नरेंद्र मोदींवर निशाणा) आपली झोळी घेऊन आश्वासनांची खैरात करत आहे.
- पंतप्रधान आभास, म्हणजे आवास योजनेचे फॉर्म भरून घेतले, अजून योजना सुरु नाही.
- आमच्याकडे मतदारांना वाटायला लक्ष्मी नाही. बाकी भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीदर्शनाबाबत बोलायचे ते बोलले आहेत.
- कोणत्याही परिस्थितीत लाचारी पत्करुन युती करणार नाही
- स्थानिक आघाडीत माझे शिवसैनिक पण स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेतील. पण धनुष्य बाण सोडायचा नाही
- आमच्या अस्तित्वाशी लढायची जर तयारी असेल तर दोन हात करायला मैदानात उतरा, कपट कारस्थान आम्हाला जमत नाही, आमची ती औलाद नाही
- पंतप्रधानांना विनंती, बेकार झालेल्यांना तुमच्या माध्यमातून नोकरी द्या, नुकसान भरपाई द्या.
- धाडी टाकताना आमच्या पुरोहितांवर धाडी टाकता. मंदिर वही बनाएंगे आणि धाडी उसीपर डालेंगे, सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर धाडी टाका
- काला त्र्यंबकचे पुरोहित आले होते. त्यांना सांगितले कर्मकांडाला समर्थन नाही पण हिंदू म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहणार. त्यांनी माल्ल्यासारखं दारु विकून पैसा कमवला नाही.