इतकंच नाही तर अंध प्रांजल पाटील ज्या पदासाठी पात्र झाली होती, त्याच इंडियन रेल्वे अकाऊंट सर्व्हिसमध्येच तिला रुजु करुन घेतलं जाणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत.
https://twitter.com/RailMinIndia/status/816556036022796290
यापूर्वी केंद्राने प्रांजलला रेल्वेऐवजी पोस्ट खात्यात नोकरीची ऑफर दिली होती. कार्मिक मंत्रालयानं प्रांजलला तातडीनं मेल करत पोस्टल अँड टेलिकम्युनिकेशमध्ये नोकरीची ऑफर दिली.
मात्र प्रांजलने हा निर्णय अमान्य करत आपल्या मेरिटनुसारच पोस्ट मिळायला हवी, अशी ठाम भूमिका घेतली होती.
यूपीएससीत घवघवीत यश मिळूनही फक्त अंध असल्यामुळे प्रांजल पाटीलला नोकरी नाकारली होती. प्रांजल पाटील हीनं यूपीएससीमध्ये 773 वा रँक मिळवला आहे.
संबंधित बातमी - UPSC रँकर प्रांजलला अंधत्वाच्या कारणाने रेल्वे सर्व्हिस नाकारली
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अंध असूनही यूपीएससीत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या प्रांजल पाटीलच्या पदरी प्रशासनाकडून निराशाच पडली. अंध असल्याचं कारण देऊन प्रांजलला इंडियन रेल्वे अकाऊंट सर्व्हिस नाकारण्यात आली. याबाबत प्रांजलची व्यथा सर्वप्रथम एबीपी माझाने मांडली.
यूपीएससीत प्रांजलचा 773 वा रँक होता. मात्र तिला गेल्या चार-पाच महिन्यात प्रशासकीय व्यवस्थेचा चीड आणणारा अनुभव आला.
जर यूपीएससीची परीक्षा घेताना तुम्ही या कॅटेगरींना संधी देता, राखीव पोस्ट ठेवता, तर मग नंतर हे कारण कसं काय देऊ शकता, असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
डीओपीटीनं पोस्ट देताना याचा विचार करायला नको होता का? मुळात अकाऊंट सर्व्हिस ही काही शारीरिक क्षमतेचीच आवश्यकता असलेली पोस्ट नाही. तिथंही आम्हाला संधी का नाकारली जाते, कुठलीही सर्व्हिस द्याल ती चालणार नाही, मला माझ्या मेरिटनुसारच सर्व्हिस मिळायला हवी, अशी मागणी प्रांजलने केली होती.
यावर रेल्वे मंत्रालयाने उर्मट उत्तर दिलं होतं.
ही मुलगी आमच्याकडे तीन-चार वेळा आली होती. पण आम्ही या केसमध्ये काही करु शकत नाही. कारण ही डीओपीटीची चूक आहे. त्यांनी तिला पोस्ट देताना नीट पाहायला पाहिजे होतं. 100 टक्के अंध असेल तर रेल्वेच्या कुठल्याच खात्यात काम करण्याची संधी नाही’ असं उर्मट उत्तर रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलं होतं.
मात्र आता रेल्वे मंत्रालयाने एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत, प्रांजल पाटीलला नोकरीत रुजु करण्याचा निर्णय घेतला आहे.