बीड : सोशल मीडियामध्ये कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. बीड जिल्ह्यात विशेषतः परळी शहरात दिवसभर एका फोटोची चर्चा होती. ज्या फोटोमध्ये पोलीस स्टेशन समोर गाढव दिसत होतं आणि पोलिसांनी गाढवाला ताब्यात घेतले अशी बातमी व्हायरल झाली. पोलीस स्टेशन समोरच्या गाढवाचा फोटो इतका व्हायरल झाला की पोलिसांनी गाढवावरच खरचं कारवाई केली का? हे पाहण्यासाठी लोक पोलीस स्टेशनकडे येऊ लागले. अखेर पोलिसांना हे जाहीर करावे लागले की त्या गाढवाला ताब्यात नाही घेतले तर फक्त हाकलले आहे.
काय आहे पोलीस स्टेशन समोरच्या गाढवाचे प्रकरण?
परळी शहरामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड केली होती. मागच्या अनेक दिवसांपासून पोलिस या वृक्षाचे काळजी करताना सुद्धा पाहायला मिळाले होते. मात्र रविवारी या ठिकाणी एक गाढव शिरले आणि त्याने यातील एक रोपटे खाल्ले. मग काय पोलीस स्टेशनमध्येच गाढवाने गुन्हा केला म्हणून या गाढवाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका पोलिसांची नियुक्ती केल्याचा मेसेज दिवसभर शहरांमध्ये फोटोसह व्हायरल होत होता.
पोलिसांनी गाढवाला ताब्यात घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. बिचाऱ्या गाढवाविषयीची सहानभूती लोक सोशल मीडियातून व्यक्त करू लागले. अनेकांनी तर गाढवाला बघण्यासाठी पोलीस स्टेशन परिसरामध्ये येऊन फेरफटका ही मारला. प्रकरण इतके वाढले की न घडलेल्या गाढवाच्या अटकेची माहिती पोलिसांना द्यावी लागली. पोलीस स्टेशन परिसरातील झाडाचा पाला खात असल्यामुळे गाढवाला बांधून ठेवले नसून हाकलून लावले होते. मात्र परिसरात उभ्या गाढवाचा कोणीतरी फोटो काढून चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.