मुंबई: माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये, ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांनीही जबाबदारीने बोलावे असा सज्जड दम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. पक्षाच्या प्रवक्त्यांनी बोलावे, इतर कुणीही शहाणपणा करु नये असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे. 


 







मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा संदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी म्हटलंय की, "पक्षाच्या प्रवक्त्यांशिवाय इतर कोणीही यावर बोलण्याचा शहाणपणा करु नये. तसेच इतर कोणत्याही विषयात पदाधिकारी वा इतरांनी काही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेच भाषेचे भान राखावे."


जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे असा दमही राज ठाकरेंनी दिला आहे. 


राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर वाद सुरू असून उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदारांनी राज ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यावर मनसेतील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने मनसे नेत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या अडचणीच्या ठरु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच राज ठाकरेंनी हे पत्र जारी केल्याचंही सांगितलं जातंय.


राज ठाकरे जून महिन्यात अयोध्या दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. 5 जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. पुण्यात 17 एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी  शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.


भाजप खासदाराचा राज ठाकरेंना इशारा
उत्तर भारतीयांची माफी मागा अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही," असा धमकीवजा इशारा भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपशब्द वापरले होते, असं ब्रिजभूषण यांनी म्हटलं आहे