मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा पाठिंबा आहे, पण आमदार रवी राणा हे आमचे नेते नाहीत,’ अशी भूमिका अपक्ष आमदारांनी घेतली आहे. आमदार रवी राणा यांनी माध्यमांसमोर येत इतर अपक्ष आमदारांची भूमिका स्वत:च जाहीर केल्याने अपक्ष आमदारांच्या गटात दुफळी पाहायला मिळत आहे.


अमळनेर मतदारसंघातील अपक्ष आमदार शिरीष चौधरी आणि कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी रवी राणा यांच्या दाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली.

‘अपक्ष आमदारांचा नेता बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये,’ असं म्हणत शिरीष चौधरी यांनी रवी राणा यांचा समाचार घेतला आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतले आहेत, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार नाही, असं म्हणत आमदार शिरीष चौधरी यांनी आपण मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं.

रवी राणा काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन चिघळत असल्याने मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असल्याचं बोललं जात होतं.

या पार्श्वभूमीवर, ‘आपण मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून मुख्यमंत्री बदलल्यास सहा अपक्ष आमदार सरकारचा पाठिंबा काढून घेतील,’ असा दावा रवी राणा यांनी केला होता.