दिल्ली : ‘धनगर समाजाच्या आरक्षणावर वेळीच लक्ष न दिल्यास मराठ्यांप्रमाणे धनगरही रस्त्यावर उतरतील,’ असा इशारा देत खासदार विकास महात्मे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.  धनगर समाजाच्या प्रलंबित आरक्षणासंदर्भात आज राज्यसभेत विकास महात्मे यांनी लक्षवेधी उपस्थित केली. त्यानंतर महात्मे यांनी 'एबीपी माझा'शी खास बातचीत केली.


‘भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात धनगर आरक्षण द्यायचं कबूल केलं होतं. पण आता धनगर आरक्षणाच्या संदर्भात शिफारस पत्र देण्यात वेळ काढूपणा केला जात आहे,’ असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

‘एका आरक्षित गटामध्ये त्याच त्याच लोकांना आरक्षणाचे लाभ मिळतात. त्याच जातीतल्या गरिबांपर्यंत मात्र हे फायदे पोहोचत नाहीत,’ असं म्हणत विकास महात्मे आरक्षणामध्ये वेटेड इंडेक्स सिस्टिमची संकल्पना मांडली.

‘एखादा आयएस धनगर आणि मेंढपाळ धनगर यांचा मुलगा यांच्यात प्राधान्यक्रम ठरवायची वेळ आली आहे,’ असंही विकास महात्मे म्हणाले.