बुलढाणा :  बॉलिवूडचा एक सिनेमा आहे डॉली की डोली... सोनम कपूर अभिनीत या सिनेमात एक टोळी खोटं लग्न लावून अनेकांना फसवत असते अशी स्टोरी आहे. असाच काहीसा प्रसंग बुलढाण्यात घडला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीशी ओळख इंदौर येथील शर्मा परिवारास चांगलीच महागात पडलं आहे. अज्ञात व्यतीने व्हॉट्सअॅपवर मुलीचा फोटो पाठवून शर्मा परिवारातील मुलाशी लग्न लावून देतो अस सांगत थेट बुलढाणा जिल्ह्यातील कोलोरी या गावात बोलावलं. शर्मा परिवाराला जवळपास एक लाखात लुटलं असून फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.  इतकंच नाही तर कोलोरी गावात शर्मा कुटुंबीयांनी त्यांना लुटणाऱ्यांबाबत विचारणा केली असता त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.


इंदौर येथील विशाल शर्मा या युवकाला लग्न लावून देतो म्हणून आधी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुलीचा फोटो पाठवला. नंतर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोलोरी या गावात बोलावून काही जणांनी मारहाण करून त्यांच्याकडून साठ हजार रुपये व सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. 


गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रातील काही जण इंदौर येथील या युवकाच्या संपर्कात होते. त्यांनी इंदौर येथील शर्मा परिवाराला कोलोरी येथे एका मुलीशी लग्न लावून देण्याच्या बहाण्याने बोलावले. विशाल शर्मा त्यांची बहीण किरण शर्मा आणि अन्य दोघे असे चौघे जण इंदौर येथून काल सकाळीच खामगाव तालुक्यातील कोलोरी या गावात आले.


तिथं आधीच लग्नाची मुलगी व तिघे जण एका घरात होते. त्यांनी दुपारी विशाल शर्मा याच गावातील एका पडक्या घरात लग्न देखील लावून दिलं. पण नंतर त्यांच्याकडून साठ हजार रुपये व सोन्याचे दागिने घेऊन मुलीसह हे भामटे गावातून पसार झाले. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शर्मा कुटुंबीयांनी गावातील काही नागरिकांना या अज्ञातांबद्दल विचारणा केली असता गावातील नागरिकांनी विशाल शर्मा व किरण शर्मा यांना मारहाण केली, अशी तक्रार त्यांनी केली आहे. 


फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शर्मा कुटुंब पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलिसांनी अज्ञात चार जणांविरुद्ध फसवणूक, मारहाण करणे असे गुन्हे दाखल केले असून पोलिसांची दोन पथक या भामट्यांच्या मागावर आहेत. एकंदरीत समाज माध्यमातून झालेली ओळख विशाल शर्माला चांगलीच महागात पडली असून आता शर्मा कुटुंबियांवर खामगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.