भंडाऱ्यात मोकाट कुत्र्याची दहशत, 35 हून अधिक जणांना चावा
एबीपी माझा वेब टीम | 10 May 2017 08:52 PM (IST)
भंडारा : तुमसर शहरात सध्या पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत पसरवली आहे. मोकाट कुत्र्यामुळे भयभीत झालेले नागरिक घराबाहेर पडण्यासही टाळत आहेत. या पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या दोन दिवसात तुमसर शहरातील शिवाजी वार्ड ,गांधी वार्ड तसेच नेहरू वार्डात तब्ब्ल 35 जणांचा चावा घेतला. उपजिल्हा रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परिसरातील लोकांनी याची तक्रार नगरपरिषदेकडे केली. मात्र, अद्यापही या पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्यात नगरपरिषदेला यश आलेले नाही. या संदर्भात तुमसर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी, तुमसर शहरात दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी जवळपास 20 हून अधिक लोकांना चावा घेतला, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिली. तर रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याने चावा घेतलेल्या जवळपास 35 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या घटनेचा आज तिसरा दिवस असून आतापर्यंत या पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 35 हून अधिक लोकांना चावा घेतला आहे. यात शालेय विद्यार्थ्यांपासून चिमुकले आणि वयोवृद्ध पुरुष-स्त्रियांचा देखाली समावेश आहे.