जळगाव: सोशल मीडिया, व्हॉट्स अॅपच्या वापरावर नेहमीचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. मात्र, या संसाधनांचा वापर करुन विधायक गोष्टीही करता येतात, हे डॉक्टरांच्या एका गटाचं दाखवून दिलं आहे.
व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून जळगावमधील शिवार हिरवंगार झाल्याचं आज पाहायला मिळत आहे. निसर्गानं या प्रदेशावर किती कृपा केली आहे, असंही मनात येऊन जातं. मात्र, ही काही एकट्या निसर्गाची कमाल नाही तर, यामागे दडलंय डॉक्टरांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपचं कर्तृत्व.
मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या 1989च्या डॉक्टरांच्या बॅचनं मनावर घेतलं आणि जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आणि अमळनेर तालुक्यात जलसंधारणाची कामं केली. देश-विदेशातील 20 डॉक्टरांनी यासाठी तब्बल 2 लाख 41 हजार रुपयांचा निधी उभा केला. डॉक्टरांच्या या कामाची दखल घेत राजकारण्यांनीही निधी जाहीर केला. मात्र, तो अद्याप मिळालेलाच नाही.
या अनोख्या उपक्रमातून जळगाव जिल्ह्यातील धरणगाव आणि अमळनेर तालुक्यात 500 एकर जमीन ओलिताखाली आली असून अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या बळीराजासाठी हा मोठा दिलासा ठरला आहे.
फक्त हाय, हॅलो, जेवण केलं का? या पलिकडेही व्हॉट्सअॅपचा विधायक वापर होऊ शकतो, हे डॉक्टरांच्या या चमूनं दाखवून दिलं आहे.