चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका डॉक्टरच्या मूर्खपणामुळे रुग्णाचा जीव गेला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णावर उपाचार करण्याऐवजी डॉक्टरनं लिंबाचा पाला खाऊ घातला. त्यामुळे अशा डॉक्टरांना सेवेत कशाला ठेवायचं असा प्रश्न पडला आहे.


 
सर्पदंश झालेल्या रुग्णाला कडुलिंबाचा पाला दिला जातो. इतकंच नाही तर मंत्रानं विष उतरवल्याचाही आरोप आहे. विशेष म्हणजे हा धक्कादायक प्रकार कुठल्याही मांत्रिकाच्या आश्रमात नाही, तर वरोऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात घडला आहे.

 

 

विशेष म्हणजे सरकारी डॉक्टर यमुना मडावी यांच्या सांगण्यावरुन आणि उपस्थितीमध्ये हे कृत्य केलं आहे आणि याच उपचाराच्या अघोरी प्रकारामुळे साठ वर्षीय शेतकरी बालाजी वाढई यांचा जीव गेला. याप्रकरणी डॉक्टर यमुना मडावी यांची चौकशी करुन कारवाईचा निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण वैद्यकीय अधीक्षकांनी दिलं आहे.

 

 

खरं तर सर्पदंश झालेल्या बालाजी वाढई यांना वेळीच योग्य उपचार मिळाले असते तर आज त्यांचा जीव वाचला असता. पण पेशानं डॉक्टर असलेल्या मडावी यांनी अघोरी पद्धत वापरली. त्यामुळे नाहक एक जीव गेलाय. आता चौकशी होईल. दोषींवर कारवाईही होईल, पण वाढई यांचा गेलेला जीव पुन्हा मिळणार आहे का? हा प्रश्न कायम आहे.