मुंबई : निवासी डॉक्टरांनी (Resident Doctors) आज संध्याकाळी 5 वाजेपासून पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. काही वेळापूर्वी हसन मुश्रीफ आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपली आहे. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आज संध्याकाळपासून सुरु होणाऱ्या संपावर आपण ठाम असल्याची माहिती निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. 


आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने निवासी डॉक्टरांकडून आजपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. अनेकदा पाठपुरवठा करून देखील सरकार आश्वासनांच्या पलीकडे कोणतेही कार्यवाही करत नसल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून शासकीय रुग्णालयातील ओपीडी बंद राहण्याची शक्यता आहे. अशात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसोबत एक बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत देखील कोणताही तोडगा निघाला नसल्याने निवासी डॉक्टर आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. विशेष म्हणजे उद्या दुपारी पुन्हा मार्डचे पदाधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण सचिव, संचालक यांच्यात बैठक होणार आहे. तर, आजच्या बैठकीत मार्डच्या मागण्यांबाबत सरकार काय काय करत आहे याची माहिती देण्यात आली आहे. 


निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या...



  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.

  • निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.

  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन ही केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे.


संपात बीड जिल्ह्यातील 205 निवासी डॉक्टरांचा सहभाग...


मागील वर्षभरापासून वसतिगृह मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे व अनियमित विद्यावेतनाचा प्रश्न राज्यभर असल्यामुळे निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. अपुऱ्या वसतिगृहांमुळे एकाच रूममध्ये दोन-तीन निवासी डॉक्टरांना राहावे लागत आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी 7 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक बोलावून दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र, आश्वासन देऊनही निर्णय होत नसल्याने आजपासून पुन्हा निवासी डॉक्टर संपावर जात आहे. यात बीड जिल्ह्यातील निवासी डॉक्टरांचा देखील सहभाग आहे. बीडच्या अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 205 निवासी डॉक्टरांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Doctor Strike in Maharashtra : निवासी डॉक्टर आजपासून संपावर, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी बोलावली बैठक, तोडगा निघणार का?