बारामती : ‘आयुष्य पुन्हा मिळत नाही असं म्हणत अनेक तरुण बरीच व्यसनं करतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य उद्धवस्त होतं. म्हणून त्यांना एकच सांगणं आहे की, व्यसनांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करुन घेऊ नका.’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. ‘व्यसनामुळे आर. आर. पाटील यांच्यासारखा हवाहवासा वाटणारा नेताही आज आपल्यात नाही.’ अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बारामती येथील शारदानगर शैक्षणिक संकुलातील यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध मुद्यांवर मार्गदर्शन केलं.

‘विद्यार्थ्यांनी आयुष्यात योग्य मित्र निवडावेत. एखादा मित्र चुकीचा असेल तर आपलं पूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं. तुम्ही सतत कार्यमग्न राहिले पाहिजे. अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष द्या. तुम्हाला जर कुणी सांगितलं की, आयुष्य एकदा मिळतं हे खाऊन बघ, पिऊन बघ तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. मी माझ्या आयुष्यात यातील एकही गोष्ट कधीही केलेली नाही.' असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, याचवेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या शाळेतील आठवणींनाही उजाळा दिला.