Kolhapur News : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत रात्रंदिवस मयतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांसोबत ठाकरे गटातील शिवसैनिकांनी दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपली. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून फराळ वाटप करण्यात आले.


पंचगंगा स्मशानभूमीत कोल्हापूर शहरातील अंत्यसंस्कार होता. कोरोनासारख्या भीषण संकटात मृत सोडून द्या, पण जिवंत माणसाला सुद्धा स्पर्श करण्यासाठी घाबरत असताना स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार केले होते. या कटू आठवणींना मागे टाकत यंदा मोठ्या हर्षोल्लासात दिवाळीचा सण साजरा करण्यात आला. 


त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाचा भाग सोडून चेहऱ्यावर स्मितहास्य यावे यासाठी फराळ साहित्यासह तेल, साबण, उठणे, टॉवेल व टोपी असे साहित्य भेट देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पत्की, शिवसेनेचे किरण पडवळ, शिवसेना उपशहरप्रमुख सुशील भांदिगरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. 


श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टकडूनही मदत


दुसरीकडे श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर यांचेकडूनही 750 गरजू व गरीब कुटुंबांना 3 हजार किलो फराळाचे मोफत वाटप करण्यात आले. 750 कुटुंबातील पुरुष आणि स्त्रिया त्याचबरोबर लहान मुलं या ठिकाणी उपस्थित होते. या फराळाच्या किटमध्ये सहा जिन्नस होते. चकली, शेव, चिवडा असे तिखट पदार्थ आणि बुंदी लाडू, खाजा, शंकरपाळी असे गोड पदार्थ यामध्ये समाविष्ट होते. यावेळी प्रत्येकी 1 किलो याप्रमाणे या सर्व पदार्थांचे वाटप करण्यात आले.


ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले की, कोल्हापुरातील दिवाळी साजरी करू न शकणारी गरीब कुटुंबं आम्ही शोधली. त्या कुटुंबांची दिवाळी आनंदी आणि सुखमय करण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला. 3 हजार किलो फराळाचे बाजारातील मूल्य 10 लाखांहून अधिक आहे. तर गेले महिनाभर परिश्रम घेऊन आम्ही हा उपक्रम यशस्वी केला.