मुंबई : तोट्यात असलेल्या एसटीचं उतपन्न वाढवण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा करणार असल्याचं रावतेंनी ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अधे-मधे न उतरवता, शेवटच्या स्टॉपवरच  उतरवण्याची शिक्षा परिवहन खात्याच्या विचाराधीन आहे.

 

एसटीच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई सेंट्रल एसटी डेपोतल्या कार्यक्रमात परिवहन मंत्री दीवाकर रावते बोलत होते.

 

एसटीतून कुणालाही फुकट प्रवास करू देणार नाही

 

एसटीतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड तर वसूल करणारच, पण त्याचसोबत त्याला शिक्षा म्हणून शेवटच्या स्टॉपपर्यंत उतरु देणार नाही. शेवटच्या डेपोमध्ये नेऊन जाब-जबाब घेणार मगच घरी सोडणार.  म्हणजे पनवेलला उतरणारा माणूस जेव्हा पुण्याला उतरेल तेव्हा तो आयुष्यात पुन्हा विना तिकीट प्रवास करणार नाही, असं यावेळी रावते म्हणाले.

 

तसंच कंडक्टरला स्वत:हून बोलावून प्रवाशाने तिकीट घेतलं पाहिजे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी माझ्याकडे भयानक इलाज आहेत. असंही रावतेंनी नमूद केलं.