पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने पुणे आणि पनवेलमध्ये छापा टाकला आहे. पुण्यातील सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर याच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. तर पनवेलमध्ये विरेंद्र तावडे यांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे.
पोलिसांनी यापूर्वीही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेच्या कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त केला होता. आता सीबीआयनेही सनातनच्या साधकांच्या घरी छापेमारी केल्यामुळे सनातन संस्थेवरील संशय बळावला आहे. दरम्यान, मात्र या धाडसत्रात सीबीआयच्या हाती काय लागलं हे अद्याप कळू शकलेलं नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळच्या पुलावर अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र या घटनेला अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतरही मारेकरी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.