अहमदनगर : मुलीच्या छेडछाडीमुळे व्यथित झालेल्या वडिलांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. मुलीच्या वडिलांनी शुक्रवारील विष प्राशन केलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज सहा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.


कर्जत तालुक्यातील बाभळगाव खालसा गावात ही घटना घडली. मृत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलीची नात्यातीलच मुलगा छेड काढत होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गावकऱ्यांच्या मध्यस्थीने प्रकरण मिटलं होतं. पण पुन्हा वाद झाल्याने उद्विग्न वडिलांनी शुक्रवारी विष प्राशन केलं.

या प्रकरणी 4 तारखेला पीडित मुलीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. आरोपी मुलाने अनेकवेळा घरात घुसून लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला होता. या प्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी मुलाच्या आई-वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर मुलगा पसार झाला आहे.