मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडीतील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याने काँग्रेसची महत्वाची बैठक आज मुंबईत पार पडली. संघ आणि भाजप धार्जिण्या मंत्र्यांना तात्काळ हटवावं, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. तसेच काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीवर देखील नाराजीचा सूर उमटलेला आहे. काँग्रेसच्या या मागणीवर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
सचिन वाझे प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडलं आहे. आज काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन मतभेद समोर आले आहेत. एका गटाचं असं म्हणणं होतं की, आरोप-प्रत्यारोप हे राजकारणात होत असतात. त्यात एका अधिकाऱ्यानं आरोप केले आहेत, त्यात काही तथ्य नाही, त्यामुळे असं असताना मंत्र्याचा राजीनामा घेणं योग्य नाहीये. परंतु, एका गटाचं असं म्हणणं आहे की, आरोप हे खूप गंभीर आहेत. तसेच हे आरोप विशेषतः गृहविभागावर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. किमान चौकशी होईपर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पदापासून दूर राहिलं पाहिजे. यामुळे याप्रकरणाची चौकशी पारदर्शी पद्धतीनं होऊ शकेल.
काँग्रेसच्या या बैठकीत राष्ट्रवादीवरही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला. या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत आणि महाविकास आघाडी सरकारची प्रतिमेला तडा जात आहे. झालेल्या आरोपांना वेळीच उत्तर देण्यात कमी पडल्याचा सूर बैठकीत होता. इतकंच नाही देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपात तथ्य नसताना राष्ट्रवादीचे प्रमुख मंत्री त्याचे खंडन करताना दिसत नाही. बचाव करताना दिसत नाही असा ही तक्रारीचा सूर आजच्या बैठकीत उमटला.
गृहमंत्रालय देखील आपली बाजू मांडण्यात कमी पडले अशी चर्चा या बैठकीत झाली. एकूणच या प्रकरणात राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांवर आरोप करण्यात आले आहेत. या गंभीर आरोपवरून सरकार अडचणीत आले आहे. यावर सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडत आहे, असं काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.
आज झालेल्या बैठकीचा सविस्तर अहवाल काँग्रेसच्या दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना पाठवण्यात येणार असून महाविकास आघाडीत काँग्रेस हा तिसरा पक्ष असून त्यांची नेमकी भूमिका काय यावर अनेक प्रश्न उपस्थित राहिले. त्यामुळे आज ही बैठक पार पडली. काँग्रेसच्या या नाराजीची दखल शिवसेना आणि राष्ट्रवादी कशी घेते हे महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :