अहमदनगर: शिर्डीत आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून सुरज ठाकुर या तरुणावर गोळीबार झाला असून शिर्डीत (Shirdi Saibaba Sansthan) असलेले प्रसाद दुकान बंद करण्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. साईबाबा रूग्णालयात या युवकावर उपचार सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हॉटेल मथुराच्या पार्कींगमध्ये सुरज ठाकुर या तरूणावर गोळीबाराची घटना घडली. साई कॉम्प्लेक्स येथे असणाऱ्या प्रसादाच्या दुकानावरून झालेल्या वादात हा गोळीबार झाला आहे. किरण हजारे, तनवीर रंगरेज, अक्षय लोखंडे, दीपक गोंदकर ,रवी गोंदकर यांनी हा संगनमताने गोळीबार केला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सुरज ठाकुर याच्यावर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शिर्डी आणि परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. शिर्डी परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालणे गरजेचे असून त्यासाठी हिट लिस्टवर असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुसक्या आळवाव्यात व शिर्डीतील गुन्हेगारी संपवण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आता साईभक्त आणि नागरिकांकडून होत आहे.
संबंधित बातम्या :