शिर्डी : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळांसह शिर्डी साईबाबांचे मंदिर भाविकांना खुले झाले आहे. असे असले तरी अनेक दिवसांपासून साईदर्शनासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय. ऑनलाइन पासची सक्ती, 10 वर्षाखालील खालील मुलांना दर्शनासाठी मनाई असल्याने भाविकांमध्ये असंतोष दिसुन येतोय. आपल्या 10 वर्षा खालील लहान मुलाला दर्शनासाठी घेऊन आलेल्या पालकांना जिथे जागा मिळेल तेथे रस्त्यावरच थांबून दर्शनासाठी वाट पाहावी लागण्याची वेळ आलीय.


राज्य सरकारने 65 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना दर्शनासाठी परवानगी दिली आणि त्याची अंमलबजावणीही शिर्डी साईबाबा संस्थानने केलीय. मात्र अद्याप 10 वर्षाखालील मुलांना बंदी कायम ठेवल्याने पालकांना मुलांसह मंदिर दर्शन रांगेबाहेरच थांबण्याची वेळ येत आहे. 10 वर्ष खालील मुलाला एकटे घरी ठेवता येत नाही आणि दर्शनाला आल्यावर त्याला बाहेरच ठेवणायची वेळ शासनाच्या नियमांमुळे भविकांवर आलीय. पालकांना दर्शनाला जाताना एकत्र जाता येत नाही. एकाला आधी जावं लागतं आणि आत जाऊन आल्यावर दुसऱ्याला जाण्याची वेळ पालकांवर आलीय. या मधल्या काळात बसण्याची कुठेही व्यवस्था नसल्यानं दर्शन रांगेबाहेरच रस्त्यावर घेऊन मुलांना बसल्याचे चित्र शिर्डीत दिसून येत आहे. यामुळे भाविकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे.


एकीकडे 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश नसल्याने हे हाल तर दुसरीकडे साईमंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना सामोरे ‌जावे लागत आहे. दर्शनासाठी फ्री असेल अथवा पेड दर्शन ऑनलाईन पास सक्तीचाच यामुळे ऑनलाइन पासबुक करताना येणारे अडथळे त्यासोबत अनेक अटी शर्ती यामुळे एकाच कुटुंबातील काहिंना दर्शन मिळते तर काहींना दर्शन न घेता माघारी परतावे लागत आहे. 



दिपावलीच्या सुट्टयांमध्ये ऑफलाईन दर्शन तसेच साई प्रसादालय खुले करण्याचा मानस संस्थानने व्यक्त केला होता. मात्र अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेल्या नसल्याने ऑनलाइन पास नसणाऱ्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. ऑनलाइन पासच्या नावाखाली शिर्डीत एजंटकडून फसवणूक होत असल्याचे भाविक सांगतात. तर दर्शनासाठी पैसे का घ्यावे असा संतप्त सवाल भाविक करताय.


दररोज केवळ 15 हजार भाविकांना दर्शन मिळत असल्याने लाखो भाविक ऑनलाईन पास मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र ही प्रक्रिया पार पाडताना अनेक भाविकांच्या खात्यातून पैसे जात आहेत. त्यातही पास मात्र मिळतच नसल्याचे समोर आलंय. याच मागणीसाठी काल भाविकांनी चक्क प्रवेशद्वारा समोर ठिया आंदोलन केले.


शिर्डी साईबाबा संस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे असून जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष तर महसुल उपायुक्त, सहधर्मादाय आयुक्त आणि संस्थानच्या कार्यकारी अधिकारी यांचा यात समावेश आहे. अगोदरच कामाचा व्याप असल्याने तदर्थ समितीतील सदस्यांना वेळ मिळत नसल्याने भाविकांना दर्शनात अडचणी येतायत. त्यात नूतन विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठवल्याने त्यांनाही कारभार पाहणे तांत्रिक दृष्टया जमत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.


संबंधीत बातम्या


Shirdi Saibaba Temple : लवकरच शिर्डीच्या साईबाबांचे ऑफलाईन दर्शन घेता येणार


Shirdi Saibaba : लवकरच साई मंदिरात ऑफलाईन दर्शन सेवा सुरू होणार