नागपूर : शिवसेना हा मित्रपक्ष असला तरी 'सामना'तील भूमिका योग्य नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. एबीपी माझाशी बोलताना गडकरी यांनी 'सामना'तील लिखाण जबाबदारी करण्याचा सल्ला शिवसेनेला दिला आहे.

भाजप आणि शिवसेना हे वेगळे पक्ष आहेत. दोघांना आप-आपली मतं आहेत. मात्र मित्रपक्षाबाबत सातत्याने अपमानजनक लिखाण ‘सामना’त छापणं योग्य नाही. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांबाबत सातत्याने आक्षेपार्ह लिखाण केलं जातं, ते थांबायला हवं, असं गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले की, "आमच्यात वैचारिक मतभिन्नता नसतानाही आणि मित्रपक्ष असूनही पंतप्रधान, अध्यक्ष, नेत्यांबद्दल सामनातून लिखाण केलं जातं. त्यातूनच आमच्यात दरी निर्माण झाली. आमच्याशी मैत्री ठेवायची असेल, तर 'सामना'मध्येही जबाबदारीने लिखाण झालं पाहिजे, याची काळजी शिवसेनेने घेतली पाहिजे. अन्यथा एकीकडे मैत्री करायची आणि 'सामना'तून रोज पंतप्रधान, अध्यक्षांबद्दल अपमानजनक लिहायचं. मग दोस्ती कशी राहणार? या गोष्टी टाळल्या असत्या तर आज भाजप आणि शिवसेनेमध्ये एवढी कटुता आली नसती. आजपर्यंत झालं ते मन मोठं करुन सोडून देऊ. मित्राचा अपमान करण्यासारखं लिखाण असेल तर संबंधांमध्ये वारंवार अडचण निर्माण होते. ती 'सामना'मुळे होऊ नये, याची काळजी शिवसेनेने घ्यावी, असं मला वाटतं."

तसंच भाजपने सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर विजय मिळवला हा शिवसेना आणि ‘सामना’चा आरोप चुकीचा असल्याचंही गडकरींनी नमूद केलं. निकाल काहीही असला तरी तो खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा, असाही सल्ला त्यांनी दिला.