कोल्हापूर : गोकूळ दूध संघाच्या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधी गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
आमदार सतेज पाटील आणि महादेव महाडिकांचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. या राड्यानंतर काही मिनिटातच सभा गुंडाळावी लागली. या सभेला काँग्रेस आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोकूळ दूध संघ मल्टीस्टेट ठराव आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर या सभेच चर्चा होणार होती. मात्र गोकूळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याच्या ठरावाला आमदार सतेज पाटील गटानं विरोध केला. दरम्यान, घोषणाबाजी सुरु असतानाच सत्ताधारी गटानं सर्व विषयांना एका मिनिटातच मंजूरी दिली.
यानंतर मात्र विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधानी एकमेकांवर चपला फेकल्या आणि दोन्ही गटात तुफान हाणामारीही झाली.
गोकूळच्या बाहेर सभामंडपावरही दगडफेक करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.