मुंबई : मेट्रो-3 चं कारशेड आरेमध्ये करण्यासाठी हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. परंतु झाडांच्या कत्तलीमुळे वादग्रस्त ठरलेलं मेट्रो-3 चं कारशेड दुसरीकडे हलवण्याची चर्चा आज (29 ऑगस्ट) मेट्रो प्रकल्पाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव येथील पहाडी भागात मेट्रो कारशेड हलवता येईल का या संबंधी चर्चा करण्यात आली. मेट्रो प्रकल्पाबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,एकनाथ शिंदे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
ठाकरे सरकार आल्यानंतर कामकाजाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली आणि पाच सदस्यीय समिती नेमून आरेऐवजी कारशेडसाठी दुसरी जागा निवडण्यास सांगितली होती. या समितीपुढे कांजुरमार्ग आणि इतर जागांसोबतच आरेपासून अवघ्या एक किमी अंतरावर असणाऱ्या रॉयल पामच्या जागेचा देखील विचार करण्यात आला होता.
आतापर्यंत आरेच्या मुद्द्यावर कसं राजकारण रंगलं?
मुंबई महापालिका जी गेली 30 वर्षे शिवसेनेच्याच ताब्यात आहे, त्याच महापालिकेतल्या वृक्ष प्राधिकरणाने आरे येथील झाडे तोडण्यास परवानगी दिली. इतकेच नव्हे तर याबाबत परवानगीचे पत्रही महापालिकेने मेट्रो प्राधिकरणाला दिलं. वृक्ष प्राधिकरण समितीत ही मंजुरी दिली जात असताना बराच गोंधळ झाला, या गोंधळातच ही मंजूरी दिली गेली. त्यानंतर एका रात्रीत 'आरे'मध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी 2700 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल करण्यास रात्रीच्या काळोखाचा आधार घेण्यात आला होता. सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींना ही बाब लक्षात येताच त्यांनी 'आरे'कडे धाव घेतली आणि मोठं जनआंदोलन सुरु झालं.
आरेमध्ये कोण, किती जागा वापरत आहे?
मॉडर्न बेकरी - 18 एकर
कोकण कृषी विद्यापीठ - 145.80 एकर
फिल्म सिटी - 329 एकर
महानंद डेरी - 27 एकर
वॉटर कॉम्प्लेक्स (पवई) - 65 एकर
आरेमधील एकूण झाडांची संख्या 4.8 लाख
आरेमध्ये होणारी वृक्षतोडीची संख्या - 2185
मेट्रो 3 साठी आवश्यक जागा - 30 हेक्टर
पुनर्रोपण करण्यात येणार्या झाडांची संख्या- 461
पुनर्रोपण करण्यात आलेली झाडे -1045
नव्याने लावण्यात येणार असलेली झाडे - 13 हजार
आरेमध्ये आतापर्यंत झालेले जमीनीचे अधिग्रहण - 333.50 हेक्टर
आरे कॉलनीची एकूण जागा - 1281 हेक्टर
आरे कॉलनीतील विदेशी झाडांचे प्रमाण - 40 टक्के