Ujani Dam Water News : यंदाच्या दुष्काळाने इतिहासातील निचांकी पातळीला पोहोचलेल्या उजनी धरणात (Ujani Dam) मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. उद्या संध्याकाळपर्यंत धारण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठ्यात येणार आहे. पुणे जिल्हा (Pune District) आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं सध्या उजनी धरणात 69 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. थोड्याच वेळात पाण्याचा विसर्ग हा 1 लाखाच्या पुढे जाणार आहे. सध्या पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 40 हजार , वडिवले धरणातून 8270 तर कासारसाई धरणातून 4500 क्युसेकस्ने विसर्ग सुरु आहे. पावसाच्या पाण्यासोबत या धरणाचे पाणीही उजनी धरणाकडे येत आहे.


सध्या उजनी धरणात वजा 14 टक्के पाणीसाठा


आज सकाळी सहा वाजता पुणे येथील बंडगार्डनमधून 70 हजार क्युसेकने पाणी बाहेर पडत होते. अजूनही पुण्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे . याचसोबत उजनी धारण परिसरातही जोरदार पाऊस सुरु असल्याने हे न मोजता येणारे पाणीही धरणात येत असल्याने उद्याच उजनी धरण शून्य पातळी ओलांडेल असा अंदाज आहे. यावर्षी उजनी धरणाने वजा 60 टक्के इतकी नीचांकी पातळी गाठल्याने यंदा उजनी धरण भरणार का? हा मोठा प्रश्न बळीराजा पुढे होता. मात्र, पावसाने साथ दिल्याने अगदी 1 जूनपासून उजनी धरणात थोडे थोडे पाणी येण्यास सुरुवात झाली होती. आज सकाळी उजनी धरण वजा 14 टक्के इतक्या पातळीत आहे. मात्र ज्या पद्धतीने पाणी धरणात जमा होऊ लागले आहे, हे पाहता उद्या संध्याकाळीपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठ्यात भरण्यास सुरुवात होईल. उजनी धरणाच्या मृत साठ्यात 63 टीएमसी तर जिवंत साठ्यात 53 टीएमसी एवढा पाणीसाठा ठेवण्याची क्षमता आहे. उद्या संध्याकाळीपर्यंत धरणात मृत साठ्यातील 63 टीएमसी पाणी साठवून जिवंत साठ्यात पाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 


पुणे जिल्ह्यातील सर्वत धरणात चांगला पाणीसाठा


सध्या नीरा खोऱ्यात देखील जोरदार पाऊस सुरु असल्याने या खोऱ्यातील वीर धरण 85 टक्के भरल्याने येथूनही पाणी सोडले जाणार आहे. भाटघर 67 टक्के, नीरा देवघर 60 टक्के आणि गुंजवणी 71 टक्के भरले आहे. वीर धरणातून आता पाणी सोडण्याचा इशारा दिला असून याचा उजनीला काही फायदा होत नसला तरी हे पाणी चंद्रभागेत येत असल्याने चंद्रभागेच्या पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. सध्या गेल्या चार दिवसापासून पंढरपूर परिसरातही मुसळधार पाऊस पडत असल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. यंदा या पावसामुळे चंद्रभागेत इतके पाणी होते की आषाढी यात्रेतही  भाविकांच्या स्नानासाठी उजनी धरणातून पाणी सोडावे लागले नव्हते. उजनी धरणावर अनेक शहरे आणि गावांच्या पाणीपुरवठा योजनांसोबत हजारो शेतकऱ्यांची शेती अवलंबून असल्याने उजनीत वाढत असलेला पाणीसाठा ही शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी ठरत आहे.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी : पुण्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, जिल्ह्याला रेड अलर्ट, शाळा-कार्यालयांना सुट्टी, हवामानाचा ताजा अंदाज काय?