Dilip Walse Patil : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला. किरीट सोमय्या (kirit somaiya) खार पोलिस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ केला.पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्याचा आरोप केला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, 'पोलिसांकडून योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतली जातेय.  राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मात्र पोलीस सक्षमपणे ही परिस्थिती काबूत ठेवतील, याचा मला विश्वास आहे. 


राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणाबाबत वळसे पाटील म्हणाले, 'पोलिसांनी त्यांच्याकडील माहितीच्या आधारे कृती केली, त्यात चुकीचं काही नाही. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार सत्तेत राहायला नको हा विरोधकांचा प्रयत्न आहे.'  राणा दाम्पत्याच्या कृती मागे नक्कीच कुणाचा तरी हात, त्याशिवाय ते असं धाडस करू शकत नाही, असंही वळसे पाटील म्हणाले.


किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत वळसे पाटील म्हणाले, 'किरीट सोमय्यांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता नव्हती. तिथे जाऊन विनाकारण संघर्ष वाढवण्याचं काम त्यांनी करायला नको होतं. मात्र जे झालं ते योग्य नाही. असं काय कारण आहे की संबंधित व्यक्तीच्या जीवाला धोका आहे, असं काय काम आहे की त्यांना z सुरक्षा देण्यात आलीय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.  लोकप्रतिनिधी म्हणून सोमय्यांना पोलीस ठाण्यात जाण्याचा अधिकार. मात्र कस्टडीमधील व्यक्तीला भेटायला जायचं काहीच कारण नाही.'


भोग्यांच्या प्रश्नावर विचार विनिमय करून प्रश्न सोडणवण्याचा प्रयत्न करू:  वळसे पाटील
विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांची उद्या बैठक आहे.भोंग्यांच्या प्रश्नावर विचार विनिमय करून भोंग्याचा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार आम्ही करू, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.