सांगलीः पक्षात मी ज्येष्ठ असताना मागून येणाऱ्या पोरांना मंत्रिपदं देण्यात आली, आणि राज्यात दुष्काळ पडल्यानंतर मला मंत्रिपद देण्यात आलं. त्यामुळं मुसलमान होणं आणि रोजाचा महिना येणं एकच होणं अशी गत झाली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
अजित पवार यांच्या हस्ते सांगलीतील शिराळा येथे विकासकामांचं उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे सोपल आणि जयंत पाटील यांच्या हस्ते कामांचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
आघाडी सरकारमध्ये सोपल यांच्याकडं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रीपद होतं. मात्र गेल्या चार वर्षांच्या दुष्काळाच्या काळात सोपल यांच्याकडंही महत्वाचा असा पाणी पुरवठा विभाग होता. योग्य ते नियोजन न झाल्यामुळं त्यांनाही जनतेच्या आणि विरोधकांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला होता.