बीड : ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हाती परंपरेने कोयता जातो आणि मग हाच उसतोडण्याचा व्यवसाय त्यांना देखील करावा लागतो. पण आता हे चित्र बदलताना दिसतंय. कारण याच ऊसतोड मजुरांची मुलं आता चक्क टॅबवर शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
एका जिद्दी शिक्षिकेने चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेचं रुपडं पालटलं आहे. अंबाजोगाईपासून जवळच असलेल्या दत्तपूर गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात टॅब आहेत. 4 वर्ग खोल्या, जेमतेम 41 विद्यार्थी, पण या विद्यार्थ्यांसाठी इथे प्रत्येक सुविधा उपलब्ध आहे.
गावकऱ्यांच्या मदतीने आर्थिक तरतूद
या शाळेत 3 वर्षांपूर्वी 23 विद्यार्थी आणि केवळ दोन शिक्षक होते. ज्योती इंगळे बदली होऊन या शाळेत आल्या. दोन शिक्षकांवर चालणाऱ्या या छोट्याश्या शाळेत गावातली मूलंही येत नव्हती. काहीतरी बदल घडवून आणावा यासाठी ज्योती इंगळे यांनी प्रयत्न सुरू केले.
शाळा डिजीटल करण्याचा निर्णय ज्योती इंगळे यांनी घेतला. मात्र त्यासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न त्यांना पडला आणि ही संकल्पना त्यांनी गावकऱ्यांसमोर मांडली. ग्रामस्थांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करुन पैसे जमवायला सुरुवात केली.
बोलक्या भिंती, मुलांच्या हातात असलेले हे टॅब हेच या शाळेचं वेगळेपण आहे. प्रत्येक टॅबला वायफाय कनेक्शन जोडलेलं असून यातूनच विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. या टॅबमध्ये वाचन-लेखनाबरोबरच विविध शैक्षणिक अॅप्स आहेत.
गावकऱ्यांच्या मदतीने दत्तापूरच्या या शाळेचं रूप बदलून गेलंय. मुलांना रोज नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. अंक गणित आणि अक्षराची ओळख व्हावी, म्हणून शाळेत रोज सहशालेय उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. शिक्षणाबरोबरच गावात साजरा होणारा प्रत्येक सन शाळेत साजरा केला जातो आणि विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.
365 दिवस चालणारी शाळा
दत्तपूरच्या या शाळेला मराठवाड्यातली पहिली टॅबची शाळा म्हणून मान मिळाला आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने पालकही समाधानी आहेत. तर अनेक पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून या शाळेत टाकलं आहे. अगदी पहिलीपासूनच या शाळेतल्या मुलांना टॅब हाताळायला मिळत आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं शिक्षण शाळेतच मिळतंय. गावकरी आणि शिक्षकांच्या सहकार्यातून ही डिजीटल शाळा नावारूपाला आली आहे.
एरव्ही विद्यार्थ्यांचा शाळेशी संबंध हा शाळेच्या वेळेपुरताच असतो. मात्र दत्तपूरची ही डिजीटल शाळा विद्यार्थ्यांचं घर बनलीये. म्हणूनच रामनवमी पासून गणेश उत्सवापर्यंत सर्व सण या शाळेतच साजरे होतात. अगदी 365 दिवस चालणारी ही जिल्हा परिषद शाळा इतर शाळांसाठी आदर्श उदाहरण आहे.