नाशिक : केंद्र आणि राज्य सरकार मिळून डिझेलचे दर आणखी चार रुपयांनी कमी करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशकात दिली. या निर्णयाने इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांना पुन्हा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
स्थानिक करांमुळे इंधनाच्या दरांमध्ये तफावत आढळून येत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलही जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकार मिळून डिझेलच्या दरातही आणखी चार रुपयांपर्यंत कपात करण्याचा प्रयत्न करत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
राज्यात पेट्रोल साडेचार रुपयांपर्यंत, तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी कमी होणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी ग्राहकांना मात्र याचा प्रत्यक्ष फायदा चार ते साडेचार रुपयांनीच झाला आहे. लिटरमागे पूर्ण पाच रुपये कमी झालेले नाहीत.
राज्यात पेट्रोलवरील वॅटमध्ये अडीच रुपयांनी कपात करण्यात आली आहे, मात्र डिझेलवरील वॅटमध्ये कपात करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने एक्साईज ड्यूटी दीड रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनीही एक रुपयांचा दिलासा दिला. याप्रमाणे राज्यात पेट्रोलसाठी किमान पाच रुपये दिलासा मिळणं अपेक्षित आहे, पण पूर्ण पाच रुपयांचा फायदा ग्राहकांना मिळालेला नाही.