Dhule ST Depo Rest Room: प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आपण नेहमीच पाहतो. मात्र याच एसटी कर्मचाऱ्यांसाठी धुळे आगारात उभारण्यात आलेल्या विश्रांतीच्या निवासस्थानाचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. हे दृश्य कोणत्याही कॉलनी किंवा इतर भागातील नसून हे दृश्य आहे तुमचा आमचा प्रवास सुखरूप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विश्रांतीच्या ठिकाणचं. धुळे आगारातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या रेस्ट रूमची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी प्रचंड घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. तर या ठिकाणी मुक्कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट जमिनीवरच झोपावं लागतंय. 


 स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था


या ठिकाणी स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून घाणीचं साम्राज्य प्रचंड पसरला आहे. तर याच आवारात काही मद्याच्या बाटल्या देखील पडल्या आहेत. बाथरूममधून बाहेर पडणारे पाणी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचून डासांचा गेल्या काही दिवसांपासून उपद्रव वाढला आहे. टॉयलेटची देखील अशीच दुरावस्था असून स्वच्छतेचा मोठ्या प्रमाणावर अभाव या ठिकाणी दिसून येतो.


कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी साध्या बेडची देखील व्यवस्था नाही


प्रवास करून थकलेल्या कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी साध्या बेडची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही. कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या रेस्ट रूमची वेळोवेळी स्वच्छता केली जात नाही, यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीच साम्राज्य पसरून कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. 12 ते 14 तास काम करून थकलेल्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीची नितांत गरज असते. मात्र या ठिकाणी आल्यावर अशा परिस्थितीत विश्रांती घ्यायची तरी कशी असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहतो.


प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र ज्या चालक वाहकांच्या जीवावर तुमचा आणि आमचा प्रवास सुखरूप होतो. त्याच कर्मचाऱ्यांना मात्र उत्तम सोयी सुविधा मिळत नाहीत, यामुळे कर्मचाऱ्यांना किमान मुबलक सोयी सुविधा तरी द्या एवढीच माफक अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होते आहे.