Agriculture Crisis: परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाले आहेत. सरकारकडून मदतीचा हात पुढे आला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ओला दुष्काळ प्रश्नी आता निर्णायक संघर्ष करण्याचे संकेत अखिल भारतीय किसान सभेने दिले आहेत.  किसान सभेच्या राज्य अधिवेशनात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 दरम्यान अधिवेशन होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. 

परतीच्या पावसाने मराठवाड्यासह राज्यात धुमाकूळ घातला  आहे. पीक मातीमोल झाली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला परतीच्या पावसाने रडवले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. 

परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी घेतलेले संपूर्ण कर्ज सरकारने माफ करावे व शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी सहाय्य म्हणून प्रति एकर ५० हजार रुपये भरपाई द्यावी, पीक विमा कंपन्यांनी अग्रिम भरपाई व विमा भरपाई द्यावी, अशी मागणी  किसान सभेने केली आहे. त्याशिवाय, दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, उसाला एफ.आर.पी. अधिक २०० रुपये एकरकमी द्यावेत आदी मागण्यादेखील किसान सभेने केले असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले.

या मागण्यांसाठी किसान सभा होणार आक्रमक 

वनजमिनी कसणारांच्या नावे कराव्यात, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करून हिरड्याला रास्त भाव द्यावा, श्रमिकांना घरकुल, रेशन व वृद्धापकाळ पेंशन द्यावे, रस्ते, कोरीडॉर, धरणे, रेल्वे, हायवे, विमानतळ आदी विकासकामांसाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना 2013 च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई व पुनर्वसन द्यावे या मागण्यांच्या अनुषंगाने अधिवेशनात चर्चा होणार आहे. 

300 प्रतिनिधी राहणार उपस्थित

राज्य अधिवेशनापूर्वी किसान सभेची राज्यभर रीतसर गाव, तालुका व जिल्हा अधिवेशने घेण्यात आली असून जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडलेले ३०० प्रतिनिधी व किसान सभेचे ७१ राज्य कौन्सिल सदस्य तीन दिवसांच्या या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून 31 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेत अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रसाद, माजी आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, अर्जुन आडे, उमेश देशमुख आदी संबोधित करणार आहेत. 