Lok Sabha Elections 2024 : मुंबईसह राज्यातील 13 मतदारसंघात आज मतदानाची रणधुमाळी रंगताना दिसत आहे. अशातच आज धुळे मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) देखील मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे. असे असताना धुळ्यातील साक्रीरोड येथील स्वामी ठेऊराम हाईस्कुल मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे बघायला मिळत आहे. या मतदानकेंद्रावर मोठ्या प्रमाणावर कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे (BJP) काही नगरसेवक आणि कार्यकर्ते सर्रासपणे बूथ जवळ उभे राहून भाजपचा प्रचार करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


मतदान केंद्रावर येणाऱ्या लोकांना भाजप कार्यकर्ते हात जोडून महायुतील (Mahayuti) मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचा खळबळजनक आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे या मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे बघायला मिळाले आहे.  


तात्काळ कारवाईची मागणी 


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रनजीत राजे भोसले यांनी अनेक आरोप करत मतदान केंद्रावर प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्याचे म्हटले आहे. या संबंधित अनेक व्हिडिओ आणि छायाचित्र मिळून आले आहेत.  यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रशासनाचे कुठलेही वचक दिसून येत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत कुठलाही प्रचार करू नये आणि कुठल्याही पक्षाच्या नगरसेवक व प्रतिनिधी प्रचार करू शकत नाही, असा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असून देखील असा प्रकार पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी पाहणी करायला आलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रनजीत राजे भोसले यांनी या गैरप्रकाराची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर नेमकी काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


धुळे मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.73 टक्के मतदान


धुळे लोकसभा मतदारसंघात आज दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे 28.73 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज दि. 20 मे रोजी सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली. धुळे- 02 लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 28.73 टक्के मतदान झाले आहे.


02-धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे-


6 धुळे ग्रामीण – 31.39 टक्के
7 धुळे शहर – 27.12टक्के
8 शिंदखेडा -27.16 टक्के
114 मालेगांव मध्य – 33.28 टक्के
115 मालेगांव बाहृय – 26.00 टक्के
116  बागलाण – 27.45 टक्के


(ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे)


इतर महत्वाच्या बातम्या