मुंबई : गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात चर्चेत असलेल्या धीरेंद्र महाराजांची (Dhirendra Maharaj) लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. धीरेंद्र महाराजांचे सोशल मीडियावरच्या फॉलोवर्सची संख्या झपाट्यानं वाढली आहे. धीरेंद्र महाराज हे बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रात यांचा राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंनिसकडून आक्षेप घेतला होता.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळला होता. या सर्व आव्हान प्रतिआव्हानाचा फायदा धीरेंद्र महाराजांनाच झालेला दिसतोय.
धीरेंद्र महाराजांचे 11 जानेवारीला 35 लाख यू ट्यूब सबस्क्राईबर्स होते. आजच्या घडीला हा आकडा 38 लाखांवर गेले. वादानंतर तीन लाखांनी सबस्क्राईबर्स वाढले. 11 जानेवारीला फेसबुक फॉलोअर्सची संख्या 26 लाख होती. आता हीच संख्या फेसबुकवर 30 लाख झाली आहे. इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्याही एक लाखांवरुन तीन लाखांवर गेली आहे.
सह महिन्यांपूर्वी धीरेंद्र महाराजांच्या यूट्यूब चॅनेलला गोल्डन बटन मिळाले आहे. जेव्हा तुमच्या चॅनेलचे सब्सक्राईसबर्सची संख्या 1 मिलिअन म्हणजे 10 लाख होते त्यावेळी तुम्हाला गोल्डन बटन मिळते. आता धीरेंद्र शास्त्री यांच्या सब्सक्राईबर्सची संख्या 40 लाखावर गेली आहे. धीरेंद्र महाराज सोशल मीडियावर लोकप्रिय होते परंतु आता त्यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या तुकोबांसंदर्भात बोलताना धीरेंद्र महाराजांची जीभ घसरली आणि नव्या वादाला तोंड फोडलं आहे. जगतगुरू संत तुकाराम (Tukaram Maharaj) महाराजांच्या पत्नीवर टिपण्णी केली आहे. तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य या बाबांनी केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. धीरेंद्र महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर धीरेंद्र महाराजांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Maharaj) यांना उपरती झाली. तुकाराम महाराज हे महान संत असून तेच आपले आदर्श आहेत, असं म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी हात जोडून महाराष्ट्राची माफी मागितली आहे. वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला गेला. त्यामुळे शब्द मागे घेत असल्याचं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत धीरेंद्र महाराज?
धीरेंद्र रामकृपाल गर्ग यांचा जन्म 1996 साली झाला. मध्यप्रदेशातल्या छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात जन्म झाला. वडिलांचं नाव रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. तीन भावंडांमध्ये धीरेंद्र सर्वात मोठे. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाले आहे. आजोबा हनुमान मंदिराचे पुजारी होते. त्यांच्या तालमीतच धीरेंद्रही महाराज बनले आणि त्याने आपले दरबार भरवायला सुरुवात केली.