धुळे : न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई यांनी दिला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून सखुबाई यांनी पतीचे अस्थी कलश घेत, मुलगा नरेंद्र पाटीलसोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि निवेदन दिले.
वीज प्रकल्पासाठी संपादित जमिनीला योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासन दरबारी चकरा मारुनही न्याय मिळत नसल्यानं अखेर हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील विखरण येथील 84 वर्षीय धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करुन स्वतःच जीवन संपवलं. या घटनेला दीड महिन्याचा कालावधी होऊन देखील सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही.
जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे नसल्यानं सखुबाई यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देत शासनाच्या ढिम्म कारभाराचा निषेध व्यक्त केला.
न्याय मागण्यासाठी पतीला जीव गमवावा लागला, असं बोलत असताना सखुबाई यांचे अश्रू अनावर झाले.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन मान्य नसल्याचं सखुबाईंनी यावेळी सांगितलं. सरकारने दिलेली 48 लाखांची मदत देखील मान्य नसल्यानं योग्य न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला.