पोलिसांकडूनच नागरिकांवर दगडफेक, शिवसेना आमदाराचे गंभीर आरोप
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 08 Mar 2018 03:56 PM (IST)
पोलिसांनीच नागरिकांवर दगडफेक करत, महिला आणि अबालवृद्धांना मारहाण केल्याचा आरोप शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादेत कचरा प्रश्नावरुन काल पडेगाव, मिटमिटा इथं झालेल्या दगडफेकीला आज वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनीच नागरिकांवर दगडफेक करत, महिला आणि अबालवृद्धांना मारहाण केल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे. तसंच या प्रश्नावर भाजप राजकारण करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शहरातील कचरा प्रश्न हा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या राजकारणामुळे पेटल्य़ाचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही पोलीस कर्मचारी दगडफेक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या पोलिसांवर मुख्यमंत्री काही कारवाई करणार का? याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. VIDEO : दुसरीकडे कचऱ्याच्या प्रश्नावरुन औरंगाबादमधील पडेगाव मिटमिटामध्ये झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 24 आंदोलकांसह हजार ते बाराशे आंदोलकांवर 307 म्हणजेच हत्या करण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कचरा प्रश्नाला हिंसक वळण काल (बुधवार) औरंगाबादेतील कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं. मिटमिटा आणि पडेगावात कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्यांची स्थानिकांनी तोडफोड केली आणि त्या पेटवून दिल्या. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत 3 अधिकारी आणि 9 पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेमुळे महामार्गावर वाहन्यांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. यातील 5 ते 6 खासगी गाड्याही ग्रामस्थांनी फोडल्या. तसंच शंभरपेक्षा अधिक दुचाकींचंही नुकसान झालं होतं. संबंधित बातम्या : औरंगाबाद कचरा प्रश्न : आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा