धुळे : धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही. या प्रकरणी भूसंपादन प्रक्रियेत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही.  याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील हे आज सकाळपासून विखरण गावातील मोबाईल टॉवरवर चढून बसले आहेत. सरकारनं मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास टॉवर वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा नरेंद्र  पाटील यांनी दिला आहे.

मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय न मिळाल्याने आणि दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशारा धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांनी दिला होता. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने नरेंद्र धर्मा पाटील यांनी  मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत दोषींवर कारवाई झाली नाही. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अपयशी ठरले आहेत. याची जबाबदारी घेऊन या मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. हे मंत्री जर स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत असतील तर आपण या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे पत्र ई-मेलद्वारे धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

मागणीकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई न झाल्यास माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील, नरेंद्र  पाटील यांनी मेलद्वारे पाठवलेल्या पत्रात नमूद केलं होतं.

धुळे जिल्ह्यातील विखरण येथील धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्यानं वीज प्रकल्पासाठी गेलेल्या शेत जमिनीला योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून मंत्रालयात 22 जानेवारी 2018 या दिवशी विष प्राशन केलं होतं. 28 जानेवारी 2018 रोजी धर्मा पाटील यांचे उपचार सुरू असताना निधन झाले होते.

संबंधित बातम्या

धुळे : धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी


हजारो धर्मा पाटील सरकार बेचिराख करतील : सामना


न्याय द्या, अन्यथा सामूहिक आत्महत्या करु, धर्मा पाटलांच्या पत्नीचा इशारा


धुळे : धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : अस्थी घेऊन पाटील कुटंब जिल्हाधिकारी कार्यालयात