धुळे: सरकारच्या अनास्थेपायी आत्महत्या केलेल्या 84 वर्षांच्या धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र आणि नरेंद्र या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यविधीसाठी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

रात्री उशीरा धर्मा पाटील यांचं पार्थिव धुळे जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी विखरणला पोहोचलं.

धर्मा पाटील यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन केलं होतं. सहा दिवसानंतर रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

तगडा पोलीस बंदोबस्त

आज अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर विखरण इथं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



धर्मा पाटील यांच्या अंत्यविधीवेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 1 डीवायएसपी, 2 पीआय, 3 एपीआय, 12 पीएसआय, 120 कर्मचारी, धर्मा पाटील यांच्या अंत्यविधीसाठी तैनात करण्यात आले होते. या अंत्यविधीला पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक नेते, पंचक्रोशीतल लोक उपस्थित राहिले.

धर्माबाबा अमर रहे

सोमवारी दुपारी मुंबईतून निघालेलं धर्मा पाटील यांचं पार्थिव रात्री ११.१५ वाजता धुळ्यातील विखरण या त्यांच्या मूळ गावी पोहोचलं. पाटील यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून खाली उतरवताच, गावकऱ्यांनी धर्माबाबा अमर रहे, जय जवान जय किसानच्या घोषणा दिल्या.

पार्थिव पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले, नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. सगळं गाव यावेळी त्यांच्या घराबाहेर जमा झालं होतं.

झुंज अपयशी

मंत्रालयात विष प्राशन केलेले 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. पाटील यांनी रविवारी 28 जानेवारीला जेजे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन वेळा धर्मा पाटील यांचं डायलिसीस करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या

चुकलं असेल तर धर्मा पाटील यांना व्याजासह मोबदला देऊ : बावनकुळे

मंत्रालयात 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर