शिर्डी : सत्तेत बसून विरोधी काम करण्याचा सेनेचा कार्यक्रम सुरु आहे. आता त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने टेन्शन गेलंय, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी म्हटलं आहे. यशवंतराव भांगरे आदिवासी सामाजिक प्रतिष्ठान आयोजित आदिवासी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे यशवंतराव भांगरे आदिवासी सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज आयोजित आदिवासी शेतकरी मेळ्यावाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विष्णू सावरा यांच्या हस्ते भांगरे स्मृती पुरस्कार देण्यात आले.

“शिवसेना सत्तेत राहून विरोधकांचे काम करत आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी अर्ज भरायचं काम सुरु असताना युती तुटली होती. यावेळी मात्र शिवसेनेने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याने एका दृष्टीनं टेन्शन गेलं.”, असे सावरा म्हणाले.

“अकोले तालुक्याचे आमदार मधुकर पिचड इतकी वर्ष आदिवासी मंत्री असताना, त्यांनी काहीही विकास केला नाही. पिचड माझे वैयक्तिक मित्र आहेत. मात्र आमची राजकीय मैत्री नाही. इतकी वर्षं त्यांना संधी मिळूनही आपल्या तालुक्याचा त्यांना विकास करता आला नाही.”, अशी टीका सावरांनी केली.

स्पेशल केस म्हणून अकोले तालुका दत्तक घेत असल्याची घोषणा यावेळी विष्णू सावरा यांनी केली. गेल्या 50 वर्षांचा बॅकलॉग भरुन काढणार असून सगळ्या बाबतीत जास्त सुविधा देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.