Dharashiv: राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठा गदारोळ झाला. हिवाळी अधिवेशनासह विरोधकांनी मस्साजोगमध्ये कुटुंबियांना भेटत हा मुद्दा लावून धरलेला असतानाच तुळजापूर तालुक्यातील बारुळ गावात शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात पवनचक्की कंपनीशी संबंधित 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा एबीपी माझाने सतत पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई करण्यात आली आहे.
पवनचक्की खंडणी प्रकरणातून धमकवण्याचा प्रकार घडला होता. तुळजापूर पोलीस ठाण्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्यावरही आता या प्रकरणाच्या सखोल तपासाची जबाबदारी आहे.
पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश
सचिन ठोंबरे या शेतकऱ्याला पवनचक्की कंपनीच्या ठेकेदार आणि गुंडांकडून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात तुळजापूर पोलीस ठाण्यात दादा पवार, अंकित मिश्रा, वैभव कदम यांच्यासह जेएसडब्ल्यू पवनचक्की कंपनी आणि इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेतकरी सचिन ठोंबरे यांची 20 गुंठे जमीन घेऊन पवनचक्की कंपनीने त्यांच्या 35 गुंठे जमिनीवर कब्जा केला होता.
या प्रकरणी पीडित शेतकऱ्याने न्यायासाठी धडपड केली होती. मात्र, पवनचक्की कंपनीच्या गुत्तेदार आणि गुंडांनी त्यांना मारहाण करत दहशत माजवली. या प्रकरणी एबीपी माझाने ठळक बातमी प्रसारित करून पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. यानंतर तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी शेतकऱ्याची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
काय आहे प्रकरण?
तुळजापूरमधील बारुळ येथील एका पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराने सचिन ठोंबरे या शेतकऱ्याला गुंडांकरवी मारहाण केली. या ठेकेदाराने करारनाम्यामध्ये असलेल्या जमिनीपेक्षा अधिकच्या जमिनीवर कब्जा केला. त्यावर तोडगा झालेल्या धनादेश वटला नाही. हा प्रकार दोन वेळा घडल्याचं ठोंबरे कुटुंबीयांनी सांगितलं. नंतर या कंपनीच्या ठेकेदाराने सचिन ठोंबरेला मारहाण केली. तसेच कोऱ्या कागदावर त्याच्या भावाच्या सह्या घेतल्याचा आरोपही करण्यात आला.
या प्रकरणी ठोंबरे कुटुंबीयांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. आता मारहाण करणाऱ्या या कंपनीवर आणि त्याच्या ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आमदार राणा जगजितसिंह आणि पोलिसांनी दिलं आहे.
हेही वाचा: