बीड : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने लवकरच त्यांच्या प्रेमासंबंधीची माहिती पुस्तक स्वरूपातून प्रकाशित करणार असल्याचे फेसबुक पोस्ट मधून सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या नात्यासंबंधीच्या चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता त्यावेळी स्वतः धनंजय मुंडे यांनी संबंधित महिलेच्या बहिणीसोबत आपण परस्पर संबंधात होतो असा खुलासा केला होता. एवढेच नाही तर या महिलेपासून आपल्याला दोन मुलं असल्याचाही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट मधून खुलासा केला होता.
करुणा धनंजय मुंडे, असं त्या महिलेचं नाव असल्याची माहिती समोर आली. करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
करुणा धनंजय मुंडे या नावाने फेसबुक अकाउंट असलेल्या पेज वरून त्यांच्यातील प्रेम कथेचे रहस्य उलगडणार असल्याचे सांगितले गेले आहे. सोबतच एक फोटोही जोडण्यात आला आहे.
केव्हापासून झाली होती वादाला सुरुवात?
सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला होता.
रेणू शर्मा यांनी मुंडेंवर काय आरोप केले होते?
रेणू शर्मा या महिलेने ट्विटरवरुन धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्मा यांनी केला होता. पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलं होतं.