सांगोला : भाजपच्या 16 भ्रष्ट मंत्र्यांसाठी देखील चंद्रकांत पाटील यांनी जेलमध्ये जागा बघून ठेवावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. सोलापुरातील सांगोला तालुक्यातील महूद येथे राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत ते बोलत होते.


भुजबळांच्या शेजारी दोन कोठड्या ठेवल्या असल्याचा टोला भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून लगावला होता. त्यावरुन धनंजय मुंडेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.

“आज मुंबईमध्ये स्थापना दिवसानिमित्त भाजप शक्तिप्रदर्शन करत आहे. मात्र त्यांनी त्यांचा स्थापना दिवस 6 एप्रिल ऐवजी 1 एप्रिल रोजी साजरा करायला हवा होता. खोटे बोलून सर्वांना ‘फूल’ बनवणारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असून आजवर जनतेला फसवणारे शक्तिप्रदर्शन करुन स्वतःचीच फसवणूक करुन घेत आहेत.” असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये निर्णय घेतात आणि उद्धव ठाकरे राज्यभर विरोध करत फिरतात, सत्तेचा मलिदा खाण्यासाठी शिवसेना लाचार असून 2019 पर्यंत 5 मंत्रिपदांची तुकडे चघळत राहा, नंतर जनता तुम्हालाही नीटनेटके करणार आहे, अशा शब्दात धनंजय मुडेंनी शिवसेनेवर केली.

मान्यवरांच्या स्वागतासाठी सर्व पदाधिकारी मोठी रॅलीने थांबले असताना, अजित पवार थेट कार्यक्रमस्थळी पोहोचले. कोणीच नेते नसल्याचे पाहून त्यांनी थेट भाषणाला सुरुवात केली. अजितदादांचे भाषण संपत असताना हल्लाबोल यात्रेतील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, चित्रा वाघ, विजयसिंह मोहिते पाटील कार्यक्रमस्थळी पोहोचले.

आपल्या आधीच अजितदादा आल्याचे पाहून ही नेते मंडळी बावरुन गेली होती. पवारांच्या भाषणानंतर पुन्हा प्रस्तावनेपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अजित पवार यांचे भाषण सुरु असताना स्टेजच्या शेजारुन होत असलेल्या गोंधळावर आधीच चिडलेले दादा भडकले आणि ‘ऐकायचे नसेल तर बाहेर जा’, अशा भाषेत गोंधळ करणाऱ्यांना समज दिली.

मोदींच्या काळात उद्योगपतींनी शेकडो कोटी रुपयांना देशाला फसवल्याचे सांगत, एवढ्या पैशात तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती, असे अजित पवार म्हणाले.