जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. सातत्याने पाठपुरावा करुन देखील प्रशासनाकडून पाण्याची समस्या सुटत नसल्याचे पाहून खडसे यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला होता. खडसेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी उपोषणाचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे.
एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या महिनाभरापासून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांसह गुरा-ढोरांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे मोठा रोष जनतेमध्ये पाहायला मिळत होता. सत्ताधारी पक्षाच्या जेष्ठ नेत्याच्या मतदारसंघातच ही पाणी टंचाई होत असल्याने विविध चर्चा आणि तर्कवितर्क जनतेमध्ये लढवले जात होते.
खडसे यांच्यासह गावा-गावातील पुढारी पाणी प्रश्नावर सरकार दरबारी पाठपुरावा करून देखील पिण्याच्या पाण्याची समस्या काही केल्या सुटत नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पूर्वसनाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर पाणी प्रश्न दोन दिवसात न सुटल्यास आपल्याला उपोषण करावे लागेल, असा इशारा दिला होता.
खडसे यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याने हा इशारा दिल्याने संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. खडसे यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या.
वीजमंडळाने खंडीत केलेला वीजपुरवठा जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पुन्हा सुरळीत झाल्याने येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांवर खडसे समाधानी झाल्याने त्यांनी दिलेला उपोषणाचा इशारा आता तात्पुरता तरी स्थगित झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याशिवाय आपले पूर्ण समाधान होणार नाही, अशी भूमिका देखील खडसे यांनी यावेळी मांडली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात पाणी प्रश्न पेटला असतानाच बोदवड पंचायत समिती सभापतींनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पाणीप्रश मांडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना त्यांनी समस्या समजून न घेता थेट बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे खडसेंचे नाराज कार्यकर्ते पाणी प्रश्न सुटावा आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कृत्याचा निषेध करावा, यासाठी बोदवड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते.
पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासनानंतर आणि मुख्याधिकाऱ्यांना समजावण्यात येईल, असे आश्वासन देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे खडसे यांच्यासह उपोषण स्थळी गेले होते. कार्यकर्ते आणि खडसे यांचे समाधान झाल्याने हे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे.