नागपूर : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यातील विरोधात आक्रमक झाले आहेत. नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधी विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.


‘शराबी’ सिनेमातील डायलॉग

“नोटबंदीच्या निर्णयामुळे मोठं नुकसान झाले. 4 लाख कोटींचा काळा पैसा आणण्यासाठी 40 लाख कोटीचं नुकसान झालं. शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यापाऱ्यांची भरपाई कशी देणार?” असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.

“नोटबंदीच्या निर्णयावर शराबी पिक्चरमधला डायलॉग आठवतो. 'नौ लाख के हार के लिए बारा लाख के ऑंसू'. नोटबंदीचा निर्णय काही प्रमाणातील काळ्या पैशासाठी हजारो कोटींच नुकसान करणारा आहे.”, असे धनंजय मुंडे म्हणाले. शिवाय, नोटबंदीचा निर्णय हा मोदीत्व सिद्ध करण्यासाठी असल्याचेही ते म्हणाले.

बँकेच्या रांगेत लोकांचे मृत्यू होत आहेत. लोक जीव मुठीत घेऊन रांगेत उभे आहेत, असे म्हणत धनंजय मुंडेंनी नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चेची मागणी केली.

मराठा मोर्चावरुन सरकारवर निशाणा

 

“मराठा मोर्चाबाबत सरकार गंभीर नाही. मित्र पक्ष मुखपत्रातून कार्टून काढून लोकभावनेचा अपमान केला. राज्य सरकारनेही अपमान केला”, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली. शिवाय, मराठा मोर्चात फूट पाडण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत, असा आरोपही धनंजय मुंडेंनी केला.

आरक्षणाचा मुद्दाही अधिवेशनात गाजणार

 

“समाज-समाजात भांडणे लावली जात आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय होत नाही. शिवसेना खिल्ली उडवत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा कागद स्थिती वेळी नाही. मुस्लिम आरक्षणाचे काय झाले? सर्वच आरक्षणाबाबत या सरकारची भूमिका उदासिन आहे.”, असे म्हणत धनंजय मुंडेंनी मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अधिवेशनात सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत.

नोटाबंदी, मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचे आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था, कुपोषण, मुंबई महापालिका, मंत्र्याची मुक्ताफळे , महागाई इत्यादी विषयांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचे धनंजय मुंडेंनी सांगितले.