नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे, मात्र त्यानंतरचं नियोजन न केल्यामुळे डॉक्टरने ऑपरेशन चांगलं केलं मात्र त्यानंतरची काळजी घेतली नाही. त्यामुळे पेशंट दगावण्याची परिस्थिती निर्माण झाली असं दिसत असल्याचं शरद पवार म्हणाले. पुण्यात राष्ट्रवादीच्या शिबीरात शरद पवार बोलत होते. भारतात 92 टक्के व्यवहार रोख होतात, ग्रामीण भागातील नागरिकांकडे कार्ड नसल्याचा दावाही पवारांनी केला.
सहकारी बँकांनी जुने पैसे घ्याचे नाही, असा निर्णय केंद्र सरकारने दिला. 5 हजार कोटींच्या आसपास रक्कम पडून आहे. त्याचं व्याज आणि विमा कोणी द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असंही शरद पवार म्हणाले.
गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारने नागरी प्रश्नाबाबत फारसं काही केलं नाही, नागरी प्रश्नावर विरोधीपक्षाकडून होणाऱ्या कामाबाबत अडवणूक केली, असंही शरद पवार म्हणाले.
'पंतप्रधानांनी मी कृषिमंत्री असताना केलेल्या मदतीचा उल्लेख केला, त्यावर अनेक जण आमच्यातल्या जवळीकीबाबत विचारतात. मात्र प्रश्न जवळीकीचा नाही. देशपातळीवर काम करत असताना कुठला पक्ष किंवा नेता हे न पाहता त्या राज्याला मदतीची भूमिका घेतली. कृषिमंत्री असताना तेच मी गुजरातबाबत केलं, त्यात जवळीकीचा प्रश्न येत नाही, त्यामुळे सत्तेत असताना हा माझा तो परका असा भेद करायचा नसतो' अशी टिपणीही शरद पवारांनी केली.