शिवसेना कुठल्या तोंडाने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडणार? - धनंजय मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 08 Dec 2016 05:09 PM (IST)
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा चौथ्या दिवशीही मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावरुन गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडणार होत्या. त्याला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार विरोध केला. "राज्यभरात निघत असलेल्या मूक मोर्चावर यांच्या मुखपत्रात 'मुका मोर्चा' असल्याचं कार्टून काढलं जातं. आमच्या तमाम माई-बहिणींची इभ्रत काढली जाते आणि मग कुठल्या तोंडाने हे प्रस्ताव मांडणार? यांना लाज नाही वाटत का?" असा घणाघात धनंजय मुंडे यांनी शिवेसेनेवर केला. काल भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली! दरम्यान, हिवाळी अधिवेशनात कालही विधानसभेत मराठा आरक्षण प्रस्तावावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली. भाजपने मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडला, त्यावेळी काँग्रेसच्या मुस्लीम आमदारांनी मराठा आरक्षणासोबत मुस्लीम आरक्षणाचा प्रस्तावही मांडण्यास सांगितले. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता.