शिर्डी : साईंच्या जन्मस्थळाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज शिर्डी बंदचा इशारा देण्यात आला आहे. याकाळात साई मंदिर मात्र दर्शनासाठी सुरू राहणार आहे. रविवारपासून शिर्डी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिर्डी बंददरम्यान साई बाबांचे दर्शन सुरू राहणार असले तरी खान्यापिण्यासापासून राहण्यासह अन्य सुविधा मिळणार नाहीत.


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका सभेत पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत 100 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे. पाथरी गावाच्या विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, जन्मस्थळाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री यावर आपली भूमिका स्पष्ट करत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शिर्डीकरांनी घेतली आहे.

साईमंदिर खुले राहणार -
अनिश्चित काळासाठी बंद पुकारल्यानंतर शिर्डीत एकही दुकान किंवा हॉटेल उघडणार नसल्याचे शिर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याअगोदर शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शिर्डी शहर आणि ग्रामीण भागातील लोकांनाही या बंदमध्ये समावेश करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिर्डीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दोन दिवस आधीच बंदचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवला जात आहे. पाथरी गावाला 100 नाही तर 200 कोटींची निधी द्यावा, आमचा काहीही विरोध नाही. मात्र, साईंचा जन्मस्थळ म्हणून पाथरीला आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पाथरीच्या ग्रामस्थांचा नेमका दावा काय आहे?
थोर अवतारी पुरूष संत श्री साईबाबा यांचे कर्मस्थान शिर्डी हे जगप्रसिद्ध आहे. श्री साईबाबांचे मूळ जन्मगाव, जन्मस्थान त्यांची पवित्र जन्मभूमी हे एक गुढ होते हे गुढ, कुतूहल साईबाबांचे परम भक्त विश्वास बाळासाहेब खेर(मुबंई)यांनी सतत 25 वर्षे संशोधन करुन सातत्याने परिस्थितीजन्य पुराव्यांचा पाठपुरावा, अनुभूती, श्री साईबाबांचे आशिर्वादाने "पाथरी" ता. पाथरी. जि. परभणी हे श्री साईबाबांचे मूळ जन्मस्थान आहे हे सिद्ध करण्यात यश मिळविले आहे.

संबंधित बातम्या :

Shirdi | साईंच्या जन्मस्थळाचा वाद आणखी चिघळणार? शिर्डी बंदचा ग्रामस्थांचा इशारा | ABP Majha