मुंबई: 'रायगडचे पालक मंत्री प्रकाश महेता यांनी पत्रकाराशी आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी सरकारने निवेदन करावं. महेता यांनी दिलगीरी व्यक्त करावी किंवा सरकारने त्यांच्याविरोधात कारवाई करावी.' अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली आहे.





तर दुसरीकडे, काँग्रेसनेही प्रकाश मेहतांच्या या उद्दाम वागण्यावर आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री मेहतांवर सत्तेची नशा दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी. तोवर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही. असंही काँग्रेसनं ठणकावून सांगितलं आहे.




 



महाड पूल दुर्घटनेप्रकरणी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारलाच प्रकाश मेहता यांनी धमकावल्याची घटना समोर आली आहे. दुर्घटनेची पाहणी करताना सेल्फी घेण्यात दंग असलेल्या प्रकाश मेहतांनी चक्क साम टीव्हीच्या पत्रकाराला दमदाटी सुरु केली.



 



 



काय आहे प्रकरण:




 



'मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाही. लांबून आलेल्या नातेवाईकांची कुठलीही सोय महाडमध्ये का केली नाही?' असे प्रश्न विचारताच प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला. 'याबाबत माझा पक्ष काय ते बघून घेईल. असं म्हणत त्यांनी पत्रकारालाच दमदाटी सुरु केली.




 



इतकंच नव्हे तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं एकीकडे लोकांचे जीव गेल्यानंतरही सरकारचा उद्दामपणा आणि धमकावणं सुरुच असल्याचं दिसतं आहे.




 



प्रकाश मेहतांचं उद्धट स्पष्टीकरण:




 



या प्रकरणाची प्रतिक्रिया एबीपी माझानं प्रकाश मेहतांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही त्यांचा उद्धटपणा कायम दिसून आला. कारण, 'पत्रकारानं असा काय प्रश्न तुम्हाला विचारला होता की, तुमचा पारा एवढा चढला?' असं विचारलं असता प्रकाश मेहता म्हणाले की, 'कोणतेही फालतू प्रश्न विचारत होते. मी फालतू प्रश्नांना उत्तरं देत नाही. काहीही अफवा पसरवल्या जात आहेत.'




 



यानंतर महाडबाबतचा प्रश्न फालतू होता का? असा प्रश्न एबीपी माझाकडून त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ततपपफ करत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ एडिट करुन दाखवला आहे. हे सगळं खोटं आहे. असा कांगावाही त्यांनी केला.






संबंधित बातम्या:


मंत्री प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्या, नाहीतर हकालपट्टी करा: काँग्रेस


'फालतू प्रश्न विचारणाऱ्यांना मी उत्तर देत नाही?' महाड प्रश्नावर प्रकाश मेहतांचं उद्दाम उत्तर