मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर सीबीआयच्या महासंचालक पदाच्या शर्यतीत आहेत. 49 जणांच्या शर्यतीत माथुर यांचं नाव आघाडीवर आहे.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका समितीनं सीबीआय महासंचालकपदासाठी 49 अधिकाऱ्यांची नावं सुचवली आहेत. यामध्ये सतीश माथुर यांचं नाव आघाडीवर असल्याचं मानलं जात आहे.

सतीश माथुर यांच्यासोबतच दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक कुमार वर्मा, आणि रुपक कुमार दत्ता यांचीही नावं चर्चेत असल्याचं म्हटलं जातं.

30 जुलै 2016 रोजी राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सतीश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली.

1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सतीश माथुर यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. त्याआधी पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.